लोणावळा : लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगात असलेल्या स्कॉर्पिओने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर संबंधित वाहनाला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ही घटना २९ जून रोजी रात्री ७.४० वाजण्याच्या सुमारास घडली. स्कॉर्पिओ (क्र. UP 80 DC 9000) वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेतले आहे.
या घटनेप्रकरणी अनिल सुर्यकांत चिंचणकर (वय ५३, रा. भैरवनाथ नगर, कुसगाव बु., लोणावळा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, कार्तिक उल्हास चिंचणकर (वय २०) व त्याचा मित्र आयान मोहम्मद शेख (वय १७) हे रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसले असताना भरधाव स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, वाहन शेजारील विद्युत पोलवर जाऊन आदळले.
या अपघातात कार्तिक चिंचणकर याचा जागीच मृत्यू झाला, तर आयान शेख गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी स्कॉर्पिओचा चालक तुलसीराम रामपाल यादव (वय ३२, रा. वडाळा पूर्व, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.