Sunday, August 3, 2025
Homeपुणेमावळभाजे धबधब्याजवळ पाय घसरून तरुणाचा मृत्यू; विसापूर मोहिमेत घडली दुर्घटना..

भाजे धबधब्याजवळ पाय घसरून तरुणाचा मृत्यू; विसापूर मोहिमेत घडली दुर्घटना..

मावळ : ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भाजे लेणी परिसरातून विसापूर किल्ल्याकडे धोकादायक जंगल मार्गाने जाताना एका 29 वर्षीय तरुणाचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज (शनिवार) दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

मृत तरुणाचे नाव अब्राहम शिंसे (वय 29, मूळ गाव – प्रिन्स अब्राहम इदातरा, पटना; सध्या – विमाननगर, पुणे) असे असून, ते पुण्यात फादरचे शिक्षण घेत होते. आज सकाळी काही मित्रांसोबत ते भाजे लेणी परिसरात वर्षाविहारासाठी आले होते.

धबधब्याजवळून डोंगर आडवाटेने किल्ल्याकडे जाताना जंगलातील निसरड्या पायवाटेवर त्यांचा तोल गेला. ते थेट दरीत कोसळले आणि डोक्यावर गंभीर मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शिवदुर्ग रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. धोकादायक आणि घसरडी वाट पार करत पथकातील सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश म्हसणे, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ व अशोक उंबरे यांनी मृतदेह खाली आणला.


मावळात पावसाळी पर्यटनात वाढते धोके.

लोणावळा व मावळ परिसर पावसाळ्यातील हिरवाई, धबधबे आणि किल्ल्यांच्या मोहक सौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरतो. मात्र, या निसर्गरम्य ठिकाणी सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर अपघात घडू शकतात. मागील काही वर्षांत विसापूर, भुशी धरण, तुंग व तिकोना किल्ला, तसेच पाझर तलाव परिसरात अनेक पर्यटकांनी प्राण गमावले आहेत.

विशेषतः पावसाळ्यात डोंगराळ भाग निसरडा व घसरडा होतो. त्यामुळे धोकादायक आडवाटांचा वापर टाळणे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे, आणि सुरक्षित मार्ग निवडणे अत्यावश्यक आहे. आजच्या घटनेतून पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाले आहे की, साहसाची मोहिनी जीवघेणी ठरू नये यासाठी पर्यटकांनी सावध राहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page