(मावळ प्रतिनिधी : संदीप मोरे)
मावळ : ज्या गणरायाची भक्तगण वर्षभर मोठया आतुरतेने वाट पाहत असतात त्या लाडक्या गणरायाचे आज घरोघरी आगमन झाले. आज मावळात पहाटेपासून सर्वत्र गणरायाच्या आगमनाची धावपळ सुरु होती. ह्या वर्षी गणेशोत्सव जरी कोरोना महामारीच्या काळात आला असला तरी भक्तांचा उत्साह मात्र तिळभरही कमी झालेला दिसत नाही.
ढोल ताशांचा गजर नसला तरी शांततामय वातावरणात गणरायांचे घरोघरी आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया…. च्या गजरात काही भक्त चार चाकी वाहनातून, काही रिक्षातून, काही दुचाकी वरून तर काही भक्तांनी त्यांना डोक्यावर स्वार करून आणले.
गणरायांच्या आगमनाने बाजारपेठेतील हार, फुले, फळे, मिठाई, डेकोरेशन व पूजा साहित्यांच्या दुकानात झालेल्या नागरिकांच्या गर्दीने बाजारपेठ अगदी गजबजून गेली आहे. ह्यावर्षी महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना दिल्या असल्याने कुठेही मिरवणूकीचे नियोजन करण्यात आले नाही, रस्त्यावर मंडप उभे करण्यास मनाई असल्यामुळे गणेशमूर्तीची एकत्र विभागवार स्थापना करण्यात आली, कुठेही विद्युत रोषणाईचा झगमगाट नाही, भव्य दिव्य देखावे नाहीत,भाविकांची गर्दी टाळत साध्या पद्धतीने ह्यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे.
ह्या वर्षी गणेशोत्सवाला कोरोनाचे सावट असले तरी विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने कोरोना संकटाचे सावट दूर होईल व विघ्नहर्ता ह्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती देओ अशी भावना असा उत्साह मावळवासीयांमध्ये दिसून येत आहे.