if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव ग्रामस्थांची मागणी , अन्यथा उपोषणाचा ईशारा..
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली ३८ वर्षे अन्याय सहन करत आपल्या भुयारी रस्त्यासाठी न्याय मागणाऱ्या भिसेगाव ग्रामस्थांच्या पदरी नेहमीच निराशा आली , मात्र त्यानंतर कुठे आशेचा किरण दिसला असताना कर्जत नगर परिषदेने ठराव व निधी उपलब्ध करून देखील या भिसेगाव ते कर्जत भुयारी जोड रस्त्याच्या कामात खोळंबा येत असल्याने संतप्त झालेले भिसेगाव ग्रामस्थांनी अखेर काम लवकर मार्गी न लावल्यास आमरण उपोषणाचा संतप्त ईशारा कर्जत नगर परिषद प्रशासनाला दिला आहे . जाणून – बुजून या भुयारी मार्गाला नाव काय द्यायचे हा मुद्दा उपस्थित करून श्रेय वादात हे काम रखडले असल्याने भिसेगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या ” श्री जय अंबे भवानी माता भुयारी मार्ग ” असे नामकरण करावे , अशी मागणी देखील आज माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियानचे अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी ग्रामस्थांच्या वतीने पालिकेला निवेदन दिले आहे.
कर्जत बाजारपेठेत बाजारहाट , आजारी रुग्ण , धार्मिक मिरवणूक , गणपती विसर्जन , यासाठी ३८ वर्षा पासून रेल्वे पटरी असल्याने वाहने ये जा करण्यासाठीचा मार्ग बंद आहे. त्यासाठी मार्ग चालू करण्याकरता अनेक आंदोलने व मोर्चे देखील भिसेगाव ग्रामस्थांनी केले परंतु अद्याप कोणताही निर्णय व सदरचा मार्ग चालू झाला नाही , याची खंत नेहमीच असताना घरपट्टी – पाणीपट्टी व इतर कर मात्र दरवर्षाला मिळत असून आमच्या या परिसरातील मुख्य अडचणी बाबत आजवर कोणतीही सुविधा पालिका प्रशासनाने दिली नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे.
या भुयारी मार्गा बाबत कर्जत नगरपरिषदेने ठराव घेऊन सुमारे १५ कोटी निधी मंजूर केला असल्याचे समजते म्हणूनच नागरिकांना या होणाऱ्या त्रासापासून लवकरात लवकर सुटका होणार असल्याचा विश्वास वाटू लागला होता, परंतु अद्यापी सदरचे काम चालू होत नसल्याने उलट सुलट चर्चेला उत आला आहे . तरी मागील ठरावा नुसार भुयारी मार्ग मंजूर केला आहे. त्याचे लवकरात लवकर आपण आपल्या स्तरावरून प्रशासकीय मंजुरी मिळण्याकरीता ज्या अडचणी असतील त्या दूर कराव्यात व काम सुरू करावे , जेणेकरून या परिसरातील नागरिकांना कर्जत शहरात येणे – जाणे सुखसोईचे होईल , या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास याविरोधात संतप्त वातावरण होऊन आपल्या कारभाराविरोधात मी व भिसेगाव ग्रामस्थांना बेमुदत आमरण उपोषणास बसावे लागेल , असा ईशारा अमोघ कुळकर्णी यांनी निवेदनात दिला आहे.
यावेळी हे निवेदन कर्जत नगरपरिषदचे अधिकारी सुदाम म्हसे व मनीष गायकवाड यांच्या कडे देण्यात आले. सदरचे निवेदन देताना अमोघ कुळकर्णी , नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , प्रकाश हजारे , मिलिंद दिसले , संजय हजारे , चेतन कडू , प्रफुल्ल निकम आदी भिसेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.