कारवाई न झाल्यास ” नारी शक्तीचा ” १५ ऑगस्ट रोजी ” आमरण उपोषणाचा ” इशारा !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागात एस टी डेपो कडे जाणाऱ्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी ” हैदोस ” घातला असून परिसरातील नागरिक , महिला वर्ग , जेष्ठ नागरिक , लहान विद्यार्थी , हे कुत्रे चावण्याच्या भीतीने ” भयभीत ” झाले असून कुत्र्यांच्या ” दहशतीखाली ” आले आहेत . काल एका विद्यार्थ्याला संध्याकाळच्या वेळी कुत्र्यांची झुंड अंगावर जाऊन कुत्रा चावल्याने संतप्त झालेल्या महिलांनी याविरोधात आक्रोश करत कर्जत पोलिसांना पाचारण केले . याविरोधात त्वरित कारवाई न केल्यास ” नारी शक्तीच्या ” प्रमुख ” ज्योती जाधव कुळकर्णी ” यांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी आमरण उपोषणाचा इशारा कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी ” तानाजी चव्हाण ” व कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ” संदिप भोसले ” यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्जत शहरांमधील भिसेगाव परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना घराबाहेर पडायची भीती वाटत असून हे भटके कुत्रे गाडीचे सीट कव्हर तसेच सोसायटी मधील इतर वस्तूंची नासधूस करत आहेत . हे कुत्रे झुंड बनून लहान मुले , जेष्ठ नागरिक, महिला वर्ग व पुरुषांवर रात्रीच्या वेळी प्राणघातक हल्ला करत असल्याने या परिसरातील सर्व नागरिक भयभीत झालेले आहेत. या कुत्र्यांना नगरपरिषद रस्त्यावर दोन कुटुंब खाद्य टाकत असल्यामुळे त्यांचा ” वावर ” वाढत असून या कुटुंबांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या प्रकारे कारवाई होणे गरजेचे होते , त्यानुसार कोणतीही कारवाई होत नाही , असे ” नारी शक्तीच्या प्रमुख ज्योती जाधव कुळकर्णी ” यांनी निवेदनात म्हटले आहे.
काल बुधवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२५ रोजी एका लहान विद्यार्थी मुलाला कुत्र्यांची झुंड अंगावर जाऊन कुत्रा चावला असल्याने घाबरलेल्या मुलाला त्वरित दवाखान्यात नेण्यात येऊन डॉक्टरांनी त्याच्यावर इलाज केला आहे . त्यामुळे या परिसरात सर्व नागरिक संतप्त होऊन नारी शक्तीच्या नेतृत्वाखाली कर्जत न. प. व कर्जत पोलीस ठाणे येथे आज निवेदन देऊन या स्वतंत्र भारतामध्ये कुत्र्यांच्या ” भीतीपोटी ” या परिसरातील नागरिकांना स्वतंत्रपणे वावरता येत नसल्याने या भीतीदायक परिस्थितून सुटका व्हावी , म्हणून १५ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व महिलांना घेऊन कर्जत लोक. टिळक चौक येथे ” आमरण उपोषणाचा ” संतप्त इशारा नारी शक्तीच्या प्रमुख ” ज्योती जाधव कुळकर्णी ” यांनी दिला आहे.
याबाबतीत मान. मुख्यमंत्री साहेब , कोकण आयुक्त , जिल्हाधिकारी रायगड , पोलीस अधिक्षक रायगड यांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहेत . कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आता मुख्याधिकारी तानाजी चव्हाण व कर्जत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले या भटक्या कुत्र्यांवर काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे .