भाजपचे नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची घेतली भेट..
भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुका हा ग्रीन झोन म्हणून ओळखला जातो . त्यामुळे येथे मुंबई व इतर ठिकाणच्या धनिकांनी शेकडो जमीन खरेदी करून आपली मौजमजा करण्यासाठी फार्महाऊस तयार केले आहेत . मात्र येथील तरुण अनेक वर्षांपासून रोजगारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे .बारा महिने येथे पाणी असूनही तालुक्यात उद्योगधंदे नसल्याने पर्यायी त्याला मिळेल तिथे काम करण्यास जावे लागते,अश्याने त्यांचे शेतीवरचे लक्ष देखील विचलित झाले आहे.
यामुळे एक पिढी नैराश्यातून गेली असून आता तरी तरुण पिढी सावरण्यासाठी तालुक्यात भूमिपुत्र तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा,उद्योगधंदे वाढावेत यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन होण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री अनुप्रियाजी पटेल यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना निवेदन व चर्चा करून केली.पूर्वी कर्जत तालुका हा शेतीप्रधान तालुका होता.
दोन वेळा भाताचे पीक घेणारा येथील शेतकरी सधन मानला जाई , मात्र नंतर येथील शेती विकली जाऊन फार्महाऊसची संस्कृती उदयास आली . येथील भूमीपुत्राने जागा विक्री केली,याला कारण होते , येथे शेतीला जोड धंदे म्हणून उद्योग धंदे नसल्याने शेती करून मिळणाऱ्या धान्यांवर कुटुंबाची गुजराण करणे अशक्य झाले.कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात रेल्वे प्रवास तर पर्यायाने तिकडेच राहिल्याने गाव सोडून राहण्याची वेळ येऊ लागली,तुटपुंज्या पगारात परवडणासे झाल्याने पुन्हा गावी माघारी यावे तर ना शेतीवाडी,ना कामधंदे यामुळे एक संपूर्ण पिढी नैराश्यातून संपून गेल्याचे विदारक चित्र कर्जत तालुक्यात पहाण्यास मिळत असताना नेहमीच तरुणांचे आधारस्तंभ राहिलेले व येथील भूमीपुत्रांच्या भवितव्यासाठी झगडणारे भाजप किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी या विषयात लक्ष घातले आहे.
यापूर्वी कोणीही मागणी न केलेली मागणी त्यांनी केली असून तरुणांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी व भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी कर्जत तालुक्यात आता तरी भावी पिढी उध्वस्त होऊन देणार नाही,असा चंग मनाशी बांधून सरळ दिल्ली गाठून केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री अनुप्रिया पटेल यांची भेट घेऊन हि माहिती देऊन सविस्तर चर्चा केली.
माझ्या कर्जत मतदारसंघात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी येथे उद्योगधंदे होणे गरजेचे आहे व त्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन करावा ,अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री अनुप्रियाजी पटेल यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच याबाबत उचित निर्णय घेऊ , असे आश्वासन ही दिले.यावेळी भाजप किसान मोर्चा कोकण संघटक व कर्जत मतदार संघाचे उभारले नेतृत्व सुनील गोगटे यांच्या सोबत कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत, अक्षय सर्वगोड आदी उपस्थित होते.