भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मुंबईचे धन दांडगे बिल्डर कर्जत तालुक्यात येऊन आदिवासी , अन्य संस्थेच्या , गावठाण , गुरचरण , अशा मोक्याच्या जागा सरकारी कागदावरून ” हद्दपार ” करून ” हडप ” करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असताना आता तर चक्क मुस्लिम समाजाचे ” पीर हजरत सय्यद पीर हमजा शाह बाबा ” यांचे पवित्र प्रार्थना स्थळ असलेल्या ममदापूर येथील ” दर्गाह ” वर कब्जा करून हडप करण्याचा प्रकार घडला असून , याविरोधात आझाद समाज पार्टी व ममदापूर मुस्लिम समाज बांधवांनी आक्रमक होत आवाज उठवला आहे . आज बुधवार दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी कर्जत उपविभागीय अधिकारी , कर्जत तहसीलदार , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक देत तीव्र संतापजनक भावना व्यक्त करत निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील मौजे ममदापूर येथील सर्वे नंबर 34/4 या दर्ग्याच्या 53 गुंठे जागेमध्ये 1980 / 81 मध्ये फेरफार न करता 53 गुंठ्यातून फक्त तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी शिल्लक ठेवण्यात आली , सन 2010 मध्ये फेरफार न करता तीन गुंठे जागा सुद्धा दर्ग्याच्या नावावरून काढून दर्ग्याचे नाव देखील काढून टाकण्यात आले , नंतर पुन्हा 2013 / 2014 मध्ये तीन गुंठे जागा दर्ग्यासाठी दाखविण्यात आली, आणि पुन्हा 2018 मध्ये सातबारा मधून दर्ग्याचे नाव काढून टाकण्यात आले. सर्वे नंबर 34 च्या 4 मध्ये एकही खरेदीखत नसताना ” शाकिब मुस्तफा पालटे आणि इतर ” हे जागेचे मालक कसे झाले , असा संतप्त सवाल आझाद समाज पार्टी व भीम आर्मीने उपस्थित केला आहे .
ज्या 13 नंबरच्या फेरफार मुळे हे सर्व या दर्ग्याच्या जागेचे मालक झाले ती कागदपत्रे तलाठी कार्यालय ममदापूर तसेच आपल्या कार्यालयातून कोणी लंपास केली तसेच फेरफार क्रमांक 816 ची आरटीएस फाईल तहसील कार्यालय , मंडळ अधिकारी तसेच तलाठी कार्यालयातून लंपास झाली आहेत , असे माहितीच्या अधिकार पत्रात समजण्यात आले आहे . हे कोणत्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून करण्यात आले ? आणि कोणी केले ? तसेच भूमी अभिलेख खात्याकडून सदर जागेचा सर्वे होत असताना दर्ग्याच्या कब्रस्तानामध्ये असलेल्या 21 कबरींचा नकाशामध्ये जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही , याची सुद्धा चौकशी व्हायला हवी, सदर जागेवर मुस्लिम दर्गाह कमिटी व मुस्लिम बांधवांची हरकत असून सुद्धा ” पालटे पॅराडाईज ” या बिल्डरला बांधकाम करण्यास परवानगी कशी मिळाली ? याची आपण त्वरित चौकशी करून सदरील बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे , व ज्या अधिकाऱ्यांकडून या सर्व गोष्टी घडल्या आहेत त्या अधिकाऱ्यांवर व बिल्डरवर कार्यालयीन व पोलीस कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, अशी संतप्त मागणी आझाद समाज पार्टी व भीम आर्मीच्या वतीने केली असून आम्हाला न्याय न मिळाल्यास या दर्गाह जागा हडप करून धार्मिक भावना दुखावल्यामुळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन , आमरण उपोषण तालुक्यात – जिल्ह्यात – व राज्यात केले जाईल , असा संतप्त ईशारा आझाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुमित साबळे , जिल्हा नेते सचिन भाई भालेराव , यांनी प्रशासनास दिला आहे.
यावेळी या धडक आंदोलनात आझाद समाज पार्टी व भीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुमित साबळे , जिल्हा महासचिव रोहित जाधव , कर्जत ता. अध्यक्ष प्रशांत भाई जाधव , जिल्हा नेते सचिन भाई भालेराव , नेते जावेद भाई खोत , ममदापूर दर्गाह चे सेवक मुसवीर मोहम्मद सईद भाईजी , रोहित सरावते त्याचप्रमाणे ममदापूर ग्रामस्थ मुस्लिम बांधव , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .