लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर रात्रीच्या वेळेस प्रवासाला परवानगी नसणाऱ्या अवजड वाहनांना महामार्गाचे काही अधिकारी आर्थिक देवाण घेवाण करून मध्यरात्री प्रवासाला परवानगी देत आहेत आणि पुणे विभागाचे काही अधिकारी ही या आर्थिक गैरव्यवहारात सामील असल्याचा आरोप महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी केला आहे.
फक्त दिवसा प्रवेश असणाऱ्या अवजड वाहनांना काही महामार्ग अधिकारी आर्थिक देवाण घेवाण करून द्रुतगती मार्गावर मध्य रात्री प्रवासाला परवानगी देत आहेत. अशा वाहनांचे व्हिडीओ व फोटो अनेकवेळा महासंचालक कार्यालयात पाठवूनही वरिष्ठानी याची दखल घेतली नसून काल रात्री 12: 40 वाजण्याच्या सुमारास अशाच एका वाहनांचे व्हिडीओ व फोटो महासंचालकास पाठवत मुंबई वाहतूक कंट्रोलला कळविल्यास ते वाहन बोरघाटात अडविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी च्या समस्येवर नियंत्रण करण्याचे मुख्य काम महामार्ग पोलिसांचे असुन लोणावळा व खंडाळा परिसरात महामार्ग पोलीस वाहने अडवून पैसे उकळत असल्याचे चित्र वारंवार पहायला मिळत आहे. सदर निवेदनाची वरिष्ठानी त्वरित दखल न घेतल्यास महाराष्ट्र वाहतूक सेनेकडून याच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश केदारी यांनी दिला आहे.