लोणावळा : लॉकडाऊन पासून बंद असलेली राज्यातील सर्व मंदिरे सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक व्यवसाय बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते.
त्यानंतर अनलॉक प्रक्रियेमध्ये हळू हळू सर्व व्यवसाय, सर्व पर्यटन स्थळे शासनाने सुरु करत ऐन दिवाळी पाडव्याच्या दिवशी सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करून दिवाळीची मंगलमय भेट शासनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ह्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून सर्व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिरे खुली करण्याचे आदेश जरी शासनाने दिले असले तरी कोरोनाचे संकट अद्याप संपले नसून दर्शनावेळी तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, सतत हात धुवावेत असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व भाविकांना केले आहे. तसेच सर्व मंदिर समित्यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली तयार करत त्याद्वारे सुरक्षेचे सर्व नियम पाळत दर्शनाची व्यवस्था करावी असे निर्देश महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहेत.