लोणावळा : लग्न जुळविणाऱ्या जीवनसाथी. कॉम या वेबसाईडवर लोणावळ्यातील एका अविवाहित महिलेला लग्नांची रिक्वेस्ट पाठवून , ओळख वाढवत तीचा विश्वास संपादित करून सुमारे 14 लाख 90 हजार रुपयांची रक्कम वेळोवेळी आँनलाईन पद्धतीने घेत तीची फसवणूक केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरच्या आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे . या आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत . आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ नहुश म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे ( रा . करांदे विमान तळाजवळ , भोपाळ . मूळ राहणार केगाव , ता . उरण , जिल्हा रायगड ) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी लोणावळ्यातील फसवणूक झालेल्या महिलेने 15 जानेवारी 2022 रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती . दिलेल्या फिर्यादी नुसार सदर महिलेने एप्रिल 2021 मध्ये लग्न जुळविणाऱ्या एका वेबसाईड वर प्रोफाइल बनविले होते . त्यावेळी नाहुश प्रशांत म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजलसाठी सदर महिलेला रिक्वेस्ट आली . त्यानंतर म्हात्रे व फसवणूक झालेली महिला यांची ओळख झाली , ओळखीअंती म्हात्रे यांनी त्या महिलेला लग्न करण्याबाबत विचारणा केली . लग्न करण्याचा विश्वास देत त्याने सदर महिलेकडून वेळोवेळी पैशाची मागणी करत 14 लाख 90 हजार रुपये आँनलाईन पद्धतीने वर्ग करून घेतले . महिलेने सदरचे पैसे परत देण्याबाबत आरोपी म्हात्रे याला फोन केला असता त्याने सदर महिलेला शिविगाळ व दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे .
आरोपी म्हात्रे याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत .पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे व लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांचे पथक या घटनेचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा ठाणे येथील फसवणुकीच्या एका गुन्हा अटक असल्याचे समजल्यानंतर कल्याण न्यायालयातून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे .
याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल अधिकचा तपास करत आहेत .