माथेरान (दत्ता शिंदे)देशात सर्वत्र कोरोना सारख्या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने देण्यात येत असलेली लस यापूर्वी जेष्ठ नागरिकांना देण्यात आली आहे त्यानंतर ४५ वर्षावरील नागरिकांना नगरपरिषदेच्या दवाखान्यात सदर लस देण्याची मोहीम सुरू केली असून याचा या सर्व मंडळींनी लाभ घ्यावा. असे माथेरान नगरीचे कार्यशील मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी आवाहन केले आहे.
अजूनही बऱ्याच लोकांनी ही लस घेतलेली नाही त्यामुळे संभाव्य कोरोना आजारावर मात करण्यासाठी या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे जेणेकरून यापुढे अठरा वर्षावरील तरुणांना ह्या लस देण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दवाखान्यात गर्दी होऊ नये ज्यामुळे कोरोनाचा प्रसार उद्भवू शकतो त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन शारीरिक अंतर ठेवून शासनाच्या नियम व अटींचे तंतोतंत पालन करण्यासाठी नागरिकांनी सुध्दा नगरपरिषदेच्या नियमितपणे सुरू असलेल्या दवंडी मार्फत आवाहनाला प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
सध्या माथेरानला दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अनेकजण कोरोना बाधीत असताना देखील बिनधास्तपणे गावात आणि आजूबाजूला वावरताना दिसत आहेत याचे दुष्परिणाम अन्य सर्वसामान्य लोकांना सोसावे लागतात अशा बेफिकीर लोकांवर यापुढे पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन देखील यासाठी पुढाकार घेत असून प्रत्येकाने स्वतःची तसेच इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. माथेरानचे पर्यटन लवकरच सुरू होण्यासाठी इथे कोरोना रुग्णांचे शून्य प्रमाण असल्याशिवाय पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही.विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यासुद्धा सातत्याने नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होण्यासाठी,कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येकानं शासनाच्या नियम व अटींचे पालन करावे असे नागरिकांना विविध माध्यमातून सूचित करीत आहेत.