मावळ( प्रतिनिधी ):मावळ तालुक्यातील 38 हॉटेल व ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबवून छापा मारण्यात आला . या छाप्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ५ हॉटेल , एक गावठी हातभट्टी व एक ताडी केंद्रावर कारवाई करण्यात आली.
मावळातील दारूबंदीच्या आंदोलनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवार दि .21 व सोमवार दि . 22 रोजी विशेष मोहीमेअंतर्गत ही कारवाई केली . या कारवाईत एकूण 8 आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3400 लिटर रसायन , 51 लिटर गावठी हातभट्टी दारू , 10 लिटर देशी दारू , 24 लिटर विदेशी दारू तसेच 27 लिटर बियर असा एकूण 1 लाख 15 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार , राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग व भरारी पथक क्रमांक 1 च्या पथकाने दिनांक 21 ऑगस्ट व 22 ऑगस्ट या दिवशी विशेष मोहीम राबवून तालुक्यातील एकूण 38 हॉटेल व धाबे यांची तपासणी केली.त्यापैकी 5 हॉटेलवर अवैधरीत्या मद्यविक्री आढळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात आले.
त्याचप्रमाणे एका गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्रावर छापा टाकून दोन गुन्हे नोंदविण्यात आले . तसेच अवैधरीत्या होणाऱ्या ताडी विक्री केंद्रावरही छापा टाकून गुन्हा नोंदविण्यात आला . या कारवाईत एकूण 1 लाख 15 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप , दक्षता व अंमलबजावणी संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार , पुणे विभागीय उपायुक्त ए . बी . चासकर , अधीक्षक सी . बी . राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड विभाग उपअधीक्षक युवराज शिंदे तळेगाव दाभाडे विभाग निरीक्षक संजय सराफ , भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षक समीर पाटील तसेच दुय्यम निरीक्षक डी . बी . सुपे , एस . टी . भरणे , ए . एस . जाधव , एम . आर . राठोड , बी . एस . घुगे , अजय बडदे व जवान संवार्गीय कर्मचारी यांच्या पथकाने केली.