Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळसहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विक्री प्रकरणात दोन आरोपींना...

सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली अमली पदार्थ विक्री प्रकरणात दोन आरोपींना अटक..

मावळ : ( श्रावणी कामत ) मावळ उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असून तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर, त्यांनी संकल्प नशामुक्ती अभियान राबवून परिसरातील युवकांमध्ये जनजागृती केली तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.
सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसांत कठोर कारवाया केल्या असून अनेक आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दिनांक 29 जुलै 2024 रोजी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे पाथरगाव गावाच्या हद्दीत काही इसम हे चारचाकी वाहनातून एम.डी. अमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहेत.
सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने परिसरात सापळा रचून, रात्री 11:40 वाजता हॉटेल मावळ माचीसमोर एक संशयित वाहन थांबवले. चौकशीत संशयित आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांची जागेवरच पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. झडतीत एकूण 5.05 ग्रॅम एम.डी. पावडर मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला. प्राथमिक चौकशीत, हा माल विक्रीसाठी आणल्याचे आरोपींनी कबूल केले.
या कारवाईत योगेश केशव गायकवाड (रा. कांब्रे, ता. मावळ, जि. पुणे) आणि नारायण सोपान दाभाडे (रा. व्हिजन सिटी, जांभूळ, ता. मावळ, जि. पुणे) यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. नं. 157/2024, एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 चे कलम 8 (क), 21 (ब) (क) तसेच भारतीय न्याय संहिता कलम 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page