कामशेत (प्रतिनिधी) : माझ्या मित्राबरोबर लग्न करण्यास नकार का दिला असे म्हणत 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना सोमवार दि . 31 रोजी पहाटे 5:45 च्या सुमारास कामशेत, इंद्रायणी कॉलनी येथे घडली . सदर हल्ल्यात फिर्यादी तरुणीच्या मानेला व हातावर गंभीर जखम झाली आहे .
याप्रकरणी सुनिल रामदास ढोरे ( वय 22 , रा . मोरया कॉलनी , वडगाव मावळ ) व एक अनोळखी आरोपी ( वय अंदाजे 20 ) यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी त्या जखमी तरुणीने कामशेत पोलिसांत फिर्याद दिली आहे .
कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी तरुणी तिच्या हातातील कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत टाकत असताना एका अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या मानेवर अचानक वार केला.त्यावेळी या तरुणीने मागे वळून पाहीले असता आरोपीने माझा मित्र सुनिल ढोरे याच्याशी लग्न करण्यास का नकार दिला ? असे म्हणून तिला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील धारधार कोयत्याने मानेवर वार करत असताना तो कोयता फिर्यादीने दोन्ही हातांनी धरला . त्यानंतर आरोपीने कोयता जोरात ओढल्याने फिर्यादीच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे . पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा पुढील तपास पोसई चव्हाण हे करत आहेत.