लोणावळा (प्रतिनिधी) : केवळ हॉटेलवाल्याला त्रास देण्यासाठी म्हणून दारूच्या नशेत 100 नंबरवर फोन करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत आरोपी अविनाश आप्पा वाघमारे ( वय 36 वर्ष , रा . रमाबाई आंबेडकर नगर , वसंतराव नाईक मार्ग , साठे चाळ , घाटकोपर ईस्ट , मुंबई 400075 ) यास अटक करून त्याच्याविरोधात भा.द.वी. कलम 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 2.48 वाजण्याच्या सुमारास आरोपी अविनाश याने दारूच्या नशेत असताना लोणावळा शहरातील साईकृपा हॉटेल एन एच 04 येथे गेला आणि पाण्याची बाटली मागितली.
त्याठिकाणी हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांनी पाण्याचे बाटलीची किंमत जास्त लावल्याचा राग मनात धरून अविनाश याने हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने विनाकारण आपल्या मोबाईलवरून 100 नंबरला कॉल करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा कट चालू आहे अशी खोटी माहिती दिली.
पोलीस कॉन्स्टेबल अक्षय प्रकाश वायदंडे ( नेमणूक लोणावळा शहर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पुढील तपास स.पो.नी. बावकर हे करीत आहेत .