मावळ (प्रतिनिधी):जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गेल्या तीन दिवसांपासून मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या सर्व संचालिकांनी वडगाव मधील विविध भागांत घरी घरकाम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करून संपूर्ण कुटुंबाला हातभार लावणाऱ्या शहरातील घरकाम करणाऱ्या महिला भगिणींचा घरी जाऊन सन्मान करण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे आणि प्रतिष्ठानच्या सर्व संचालिका यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम हाती घेतला.
शहरांमधील तळागळातील महिलांकडे अनेकदा समाजाकडून दुर्लक्ष होत असते त्यांचा मान सन्मान तर सोडा विशेष दखलही घेतली जात नाही हा विचार करून गेली अनेक वर्षे शहरात धुणी भांडी व घरकाम करणाऱ्या महिलांना साडी, मिठाई व सन्मानचिन्ह आदी भेट वस्तू देऊन त्यांचा विशेष सन्मान करत महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी उपस्थित घरकाम करणाऱ्या महिला भगिनी अक्षरश: भारावून जात भावनिक झाल्या होत्या,त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होते. त्यांच्या मनातील आनंद दिसून येत होता.
कारण, रोजच्या जीवनात प्रचंड कष्ट करून चार शब्द प्रेमाचे आणि एक क्षण सुखाचा न अनुभवू शकणाऱ्या महिला पहिल्यांदाच सन्मान स्वीकारत होत्या. येत्या पाच दिवसात शहरात घरकाम करणाऱ्या महिला भगिणींचा सन्मान करण्यात येणार आहे. तरीही नजर चुकीने कोणतीही घरकाम करणारी महिला दुर्लक्षित व्हायला नकोय यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानला संपर्क करू शकता. यानिमित्ताने असे आवाहन अबोली ढोरे यांनी केले आहे.
यावेळी अबोली ढोरे म्हणाल्या की खरंतर दुसऱ्यांच्या घरातील मलीनता दूर करीत स्वतःच्या घराला घरपण देणाऱ्या या महिलांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. त्यांच समाजातील स्थान महत्त्वाचा आहे. मात्र त्यांच्या वाटेला तेवढा सन्मान येत नाही हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील जवळपास 100 महिलांचा सन्मान करून त्यांच समाजातील योगदानाबद्दल कौतुक करत असून यावेळी विविध भागात महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या घरी जात असताना बऱ्याच महिलांचे अनेक प्रश्न अनुभवास मिळाले काहींचे रेशन कार्ड व आधार कार्ड बाबत तर काहींच्या विविध गंभीर समस्या आहेत. शहरात घरकाम करणाऱ्या महिलांच्या काही कुटुंबाकडे रेशनिंग कार्ड आहेत. पण, त्यांना रेशनिंग दुकानदारांकडून रेशनिंगच मिळतच नाही.
तर काही कुटुंबांनी रेशन कार्ड काढलेले नाहीत, त्यांना नवीन रेशनिंग कार्ड काढायचे असून काहींना रेशन कार्ड मध्ये नवीन नावे समाविष्ट करण्याची देखील गरज आहे. यावेळी या महिला भगिनींना आश्वासित केले की येत्या काही दिवसातच आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच मोरया महिला प्रतिष्ठानचे आजपर्यंतचे सामाजिक कार्य या अशा समाजातील उपेक्षित वंचित व तळागळातील महिलांसाठीच आहे व ते आम्ही पुढेही आणखी जोमाने करीत राहणार आहे. कारण या महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदच आम्हाला काम करण्याची आणखी प्रेरणा व नवी ऊर्जा देत असतो.