लोणावळा : कोरोना विषाणूचे संकट आजही असल्याने यंदाचा नवरात्र उत्सव साध्यापनाने साजरा करण्यात यावा त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नियमावली पत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासकीय सूचनांप्रमाणे प्रशासनाच्या परवानगी नुसार मंडप नियोजन करून. यंदाचा नवरात्र उत्सव घरगुती व साध्यापणाने साजरा करावा. मंडळांनी चार फूट उंचीची मूर्ती व घरगुती दोन फूट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
मूर्ती पर्यावरण पूरक असल्यास तीचे विसर्जन घरच्या घरी किंवा कृत्रिम विसर्जन स्थळांवर करण्यात यावे. सालाबादप्रमाणे दांडिया, गरबा रास व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन प्रशंसनीय असायचे परंतु यंदा ह्या सर्व कार्यक्रमांऐवजी माझे कुटुंब माझी जबाबदारी, रक्तदान शिबीर, कोरोना, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांवर जनजागृती व आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. तसेच देवीची आरती, भजन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याची पूर्ण जबाबदारी मंडळाची असेल.
ध्वनी प्रदूषण टाळण्यात यावे, देवीचे आगमन व विसर्जन वेळी मिरवणूक काढू नये, मंडपात पाच सदस्यांपेक्षा जास्त लोकांना बंदी घालण्यात आली असून कार्यक्रमावेळी कसलीही गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्या आहेत.