पुणे दि.3: राज्यातील कोरोना स्थिती पाहता राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी मधील विध्यार्थी विना परीक्षा पास करण्यात येणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शिक्षण व्यवस्थाही तितकीच कोलमंडली आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन पद्धतीने सुरु झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. मात्र इंटरनेटच्या अडचणी आणि पुरेशा प्रमाणात साधनाची उपलब्धता नसल्याने विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी आल्या. प्रामुख्याने ग्रामीण भागातून अशा अडचणी शहरी भागाच्या तुलनेत जास्तच आहेत.
कोरोनाच्या काळात विध्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यंदा जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्य मापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही.शहरी भागातील काही अनुदानित शाळांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या असून आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.
त्यासाठी कोणती कार्यपद्धती वापरावी याबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या अशा पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यंदाच्या वर्षी पहिली ते आठवी मधील विध्यार्थ्यांना विना परीक्षा पुढील वर्गात बढती करण्याची घोषणा केली आहे.