रायगड: प्रतिनिधी ( श्रावणी कामत )आज दिनांक 28 मे रोजी रायगड जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीतल्या टाटा स्टील कंपनीमध्ये वायू गळती झाल्याची खबर दिली गेली. आपत्ती व्यवस्थापनाकडून ही माहिती मिळता क्षणीच खालापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तहसीलदार आयुब तांबोळी, निवासी तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी तात्काळ सर्व यंत्रणांना वायुगळती झालेल्या ठिकाणी रवाना होण्याचे आदेश दिले.
त्यानुसार खालापूर तालुका पोलीस ठाण्याची यंत्रणा, खालापूर तालुका महसूल विभागाचे विविध अधिकारी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, टाटा स्टील कंपनीचे अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी तसेच अन्य संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी एम के म्हात्रे यांनी तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व यंत्रणाचे कौतुक केले आणि अशाच पद्धतीने कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी सतर्क राहण्याचे आदेश दिले.
गेल्या काही दिवसात रसायनी, पातळगंगा, डोंबिवली, महाड इत्यादी ठिकाणी घडलेल्या अग्निप्रलय आणि वायूगळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील यंत्रणा किती सतर्क आहेत याचा आढावा आणि अंदाज घेण्याचे दृष्टिकोनातून मॉकड्रीलचे आयोजन करण्यात आल्याची माहिती एम के म्हात्रे यांनी दिली.