रायगड : अलिबाग-रायगडात सध्या पावसाचं थैमान असल्यामुळे नदी,ओढे,खाडी व धरणाच्या खाली पाणी दुथडी भरून वाहू लागले आहेत, त्याच बरोबर खाडी व समुद्रकिनारी लाटांचा मारा मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाण्यात बुडण्याची अथवा वाहून जाण्याची आपत्ती आल्यावर प्रशासनाच्या सूचनाचे पालन करा असे मार्गदर्शन रायगड भूषण जयपाल पाटील यांनी केले.मजगाव ग्रामपंचायत आयोजित आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सरपंच पवित्रा चोगले, उपसरपंच प्रीतम पाटील, ग्रामसेवक सुशांत ठाकूर,सदस्य एनाज अली सुभेदार,माजी सदस्य योगेंद्र गोयजी हे उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत सरपंच पवित्रा चोगले यांनी केले.यावेळी जयपाल पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की आपले प्रशासन जेव्हा सांगते की कोणीही घराबाहेर पडू नये व खाडी व समुद्रकिनारी जावु नये तरीही अनेकजण कुटुंबासहित या ठिकाणी गुपचुप पोहोचतात आणि प्रशासनाला त्रास देतात तसेच आपलेही नुकसान करुन घेतात, यासाठी सागर सुरक्षा रक्षक दलाच्या सदस्यांनी आणि समाजसेवकांनी व ग्रामस्थांनी सुद्धा त्यांना विनंती करावी अन्यथा यांच्यासोबत हुज्जत न घालता नजीकच्या पोलिस ठाण्यांमध्ये संपर्क करावा.
यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी 112 क्रमांक महाराष्ट्र पोलिसांचा वापर करताच मुरुड पोलीस ठाणे येथून हवलदार भाग्यश्री म्हात्रे व रसाळ हे 20 मिनिटात येऊन पोहोचले आणि सुरक्षा बाबत माहिती दिली. मच्छिमार बांधवांनाची सुरक्षा, घरातील विजेची उपकरणे गॅस अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर,बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा आणि मोबाईलची सुरक्षा, साप, विंचू दंश, लहान मुले, ज्येष्ठांच्या सुरक्षेबाबत माहिती दिली. यावेळी 64 ग्रामस्थ, मुले उपस्थित होती. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक सुशांत ठाकूर यांनी केले तर आभार सदस्य एनाज अली सुभेदार यांनी मानले.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सेविका कांचन ढमाले, अनिता फेगंडू, गीतांजली अमृते, ग्रामपंचायत सदस्य व प्रकाश मुंबईकर,अश्विनी चौरे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.