भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) या जगात पैशाला व सोन्याला अनन्य साधारण महत्व आहे . आपल्या मेहनतीने व कष्टाने केलेले सोने अनावधानाने कुठे पडले तर आपली झोप उडून जाते , मात्र ज्याला हे गाठोडे मिळते , त्यांच्या अंगात आई वडिलांचे चांगले संस्कार असल्याने भेटलेली वस्तू ज्याची त्याला परत करणे , हे गुण असणे शाबासकीचे दर्शन घडवून जाते.त्या सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाची एक थाप पाठीवर पडल्यावर जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटते.
अशीच एक घटना कर्जत नगर परिषद हद्दीत गुंडगे प्रभागात घडली.रस्त्यात मिळालेले सोन्याची गोठडी हरवलेल्या त्या व्यक्तीस परत देऊन श्री सोमजाई ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष श्री निलेश म्हामूणकर ह्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र उदोउदो व वाहवा होत असताना दिसत आहे.आज दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागात गुंडगे रेशनिंग दुकान जवळ एक सोन्याच्या दागिन्यांची पिशवी सोमजाई ग्रामस्थ मंडळाचे उपाध्यक्ष श्री निलेश म्हामूणकार ह्यांना मिळाली.
या पिशवीत अंदाजे ४ ते ५ तोळा सोने होते , अंदाजे रक्कम अडीच ते तीन लाख रुपयांचे ते सोने होते , हे सोने श्री ज्ञानेश्वर सुर्वे राहणार आवळस ह्यांच्या पत्नीचे होते , आपली सोन्याची पिशवी कुठेतरी पडली हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोध मोहीम सुरू केली , व ते गुंडगे येथील रेशन दुकानाजवळ आले , ज्ञानेश्वर सुर्वे काहीतरी शोधत आहेत , हे निलेश म्हामूणकार ह्यांना निदर्शनास आल्यावर त्यांनी विचारपूस केली असता , आपल्याला मिळालेली सोन्याची पिशवी ही त्यांचीच आहे , तुम्ही घाबरू नका , मला ती पिशवी सापडली आहे , हे ज्ञानेश्वर सुर्वे यांना सोमजाई ग्रामस्थ मंडळ – गुंडगे उपाध्यक्ष श्री निलेश म्हामूणकार यांनी त्यांना सांगितल्यावर त्यांच्या जीवातजीव आला . व येथील गुंडगे प्रभागाचे नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , कांगणे गुरुजी , शिवसेनेचे विभागप्रमुख पंकज पवार , व इतर गुंडगे ग्रामस्थ मंडळाचे तरुण कार्यकर्ते यांच्यासमोर त्यांनी हि लाखो रुपयांची सोने असलेली पिशवी परत केली.
श्री निलेश म्हामूणकर यांच्या या प्रमाणिकपणाच्या दर्शनाने त्यांचे गुंडगे ग्रामस्थ मंडळ , अजयशेठ पाल मित्र मंडळ , शिल्पकार युवक मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला . तर त्यांच्या या महान कार्यास सर्वत्र वाहवा होत असून , ” सलाम तुमच्या कार्याला ” असे गौरवोद्गार काढण्यात आले.