लोणावळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपावर वैयक्तिक विज वाहिनी द्वारे विज पुरविली जाणार.. मान्सूनपूर्व MSEDCL ची खबरदारी
लोणावळा : तौक्ते चक्री वादळाने राज्यात धुमाकूळ घातला होता. त्याच पाठोपाठ आता “यास ” चक्री वादळाचे संकट जिल्ह्यावर आले आहे.यास चक्री वादळ हे बिहार मध्ये धडकले असून याचा प्रभाव जवळील चार राज्यांना होणार आहे. महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अमरावती, लातूर, अकोला जालना व पुणे ह्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे हवामान वेद शाळेने वर्तविला आहे.लोणावळा शहरात अशाच वादळामुळे खूप नुकसान होत आहे. मागील तौक्ते वादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली, बहुतेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने शहरातील विज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे शहरातील नागरिकांना अंधाराबरोबर पिण्याच्या पाण्या अभावी दोन दिवस त्रास सहन करावा लागला हे काही लोणावळेकरांना नवीन नाही.
गेली पाच ते सहा वर्ष प्रत्येक पावसाळा, प्रत्येक वादळासारख्या परिस्थितीत हा त्रास सहन करावा लागत आहे. हे मात्र नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक यांनी लक्षात घ्यावा. चक्री वादळामुळे शहरात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी त्याचा त्रास नागरिकांना अंधारात व पाण्यावाचून सहन करावा लागत आहे. यास चक्रीवादळ आपल्या जिल्ह्यात तीन दिवसात धुमाकूळ घालणार आहे तरी शहराच्या सुरक्षे अभावी लोणावळा प्रशासनाने काय तरतूद केली आहे.
याचा आढावा घेत असताना शहर व परिसरातील विज पुरवढ्याविषयी लोणावळा विज वितरण कंपनी कडून मिळालेल्या माहिती नुसार कार्ला डिव्हिजनचे अधिकारी पठाण साहेब यांनी दिलेल्या माहिती नुसार वारा पाऊस झाला की झाडांच्या फांदया विज वाहिन्यांवर पडून जास्त प्रमाणात विज पुरवठा खंडित होत असतो म्हणून कार्ला MSEB च्या हद्दीतील भागात विजवाहिन्यांवरील झाडांच्या फांदया छाटण्यासाठी आठ ते दहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच लोणावळा शहरात विज पुरवठा खंडित झाला की शहरातील पाणी पुरवठाही खंडित होत असतो त्यासाठी खबरदारी म्हणून लोणावळा विज वितरण कंपनीकडून नगरपरिषदेच्या पाणी पंपावर एका वैयक्तिक विज वाहिनी द्वारा विज पुरवठा केला जाणार असल्याची माहिती लोणावळा विभागाचे अभियंता चव्हाण साहेब यांनी दिली आहे.
यास चक्रीवादळ असो वा पावसाळा असो शहरातील विज पुरवठा सुरळीत ठेऊन जल पुरवठा खंडित होणार नाही त्यासाठी आमचे परिश्रम सुरु आहेत असे ही यावेळी बोलताना लोणावळा विभागाचे अभियंता चव्हाण साहेब व कार्ला विभागाचे पठाण साहेब यांनी सांगितले.पावसाळा आला की वारा पाऊस यामुळे ठिकठिकाणी झाडे पडून विजेचे खांब कोसळतात, आणि विज वाहिन्या देखील बऱ्याच प्रमाणात तुटत असतात त्यामुळे शहरातील विज पुरवठा चार ते पाच दिवस खंडित झाल्याने पाण्याच्या समस्येला शहरातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
हे सत्र सातत्याने सुरु असून वारा पाऊस झाला की विजपूरवठा खंडित होऊ नये यासाठी विज वितरण कंपनी पूर्व तयारी करत आहे. म्हणूनच वेळ येऊन गेल्यावर जनजागृती करण्यापेक्षा वेळ येण्यापूर्वीच तयारी करणे जास्ती शहाणपणाचे असेल. शहरात अनेक ठिकाणी MSEB चे DP बॉक्स खुल्या अवस्थेत आहेत ते झाकून घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती लोणावळा विज वितरण कंपनी कडून मिळाली आहे.