लोणावळा : जागतिक आरोग्य दिनानिमित्त लोणावळा गिल्डच्या वतीने सामाजिक भान जपत उपक्रम राबविण्यात आला. या विशेष दिवशी महात्मा गांधी शाळा क्रमांक ८ तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या वलवण शाळेला वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. रमेश अभानवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला.
स्वच्छ पाण्याचा वापर आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमात दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गिल्डच्या अध्यक्षा रत्नप्रभा गायकवाड यांनी आरोग्य दिनाचे महत्त्व सांगताना, ‘स्वच्छ पाणी म्हणजेच आरोग्यदायी जीवन’ हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले. त्यांनी स्वच्छ पाण्याचे फायदे उलगडून सांगत त्याची नियमित सवय लावण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात उपाध्यक्षा सायली जोशी, सचिव हेमलता शर्मा, सदस्य अंबिका गायकवाड, पूर्वा गायकवाड, आशिष जहांगीर व शशिकांत भोसले यांच्यासह इतर सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
समाजातील आरोग्य विषयक भान जागृत व्हावे व विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी, या हेतूने गिल्डकडून अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येते. यावेळीही उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत गिल्डच्या कार्याची स्तुती केली.