लोणावळा दि.5: जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या, रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या दुकानदारांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई.
जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दि.3 एप्रिल रोजी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु ठेवणे तसेच सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत जमावबंदी तर सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
त्यानुसार जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असे आदेश स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका व पोलीस प्रशासनास डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.त्याचीच अंमलबजावणी करत काल रात्री उशिरा पर्यंत लोणावळा परिसरात ग्रामीण भागातील 11 आस्थापनावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या सूचनेनुसार उप निरीक्षक अनिल लवटे व पोलीस स्टाफ यांनी ही कारवाई केली आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून जमावबंदी, संचारबंदी, मास्क सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग अशा नियमांचे काटेकोरपणे पालन करून शासनास सहकार्य करावे असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.