लोणावळा दि.21: लोणावळा परिसरात घरफोड्या व चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठया शिताफिने केली अटक दोन मोटारसायकल सह एकूण 2 लाख 58 हजार मुद्देमाल केला हस्तगत.
लोणावळा परिसरात घरफोडया व चोऱ्या करणारा सराईत आरोपी वसीम सलाउद्दीन चौधरी यास मोठया शिताफिने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाकसई येथून घेतले ताब्यात.सदर आरोपीस 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे दि.20 रोजी सायंकाळी 6 वा. च्या सुमारास कार्ला फाटा येथे बंदोबस्तावर असताना गोपनीय सूत्रांकडून त्यांना बातमी मिळाली की एक संशयीत इसम हा वाकसई येथील तुकाराम महाराज मंदीर परिसरातील सोसायटी व बंगल्यांची पाहणी करत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी लोणावळा ग्रामीणच्या तपास पथकास सदर इसमाचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
सूचना मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस हवालदार जय पवार, पोलीस हवालदार कुतूबूधीन खान, पोलीस हवालदार विशाल जांभळे,पोलीस नाईक प्रणय उकिर्डे, पोलीस नाईक जाधवर, महिला पोलीस नाईक पुष्पा घुगे, पोलीस शिपाई सिद्धेश्वर शिंदे, पोलीस शिपाई रहीस मुलाणी, पोलीस शिपाई कमठनकर, होमगार्ड दिनेश मराठे, अमित भदोरिया यांच्या पथकाने वाकसई फाटा येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या मागील सोसायटीमध्ये आपले तपास कार्य सुरु असताना त्याठिकाणी सदर आरोपी परिसराची पाहणी करत असताना आढळून आला आरोपीने पोलीस बघून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता एकदम सिनेस्टाइलमध्ये लोणावळा ग्रामीणच्या तपास पथकाने आरोपी वसीम सलाउद्दीन चौधरी याला ताब्यात घेतले.
व त्याने केलेल्या गुन्ह्यातील दोन मोटारसायकल, दोन सुवर्ण कर्णफुले, एक मोबाईल व रोख रक्कम 58 हजार असा एकूण 2 लाख 58 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गु. र. नं.351/2021 भा द वी कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस तपास पथक करत आहेत.