लोणावळा दि.11: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणा व समाजातील प्रत्येक घटक हा मदतकार्य करण्यासाठी जीवाचे रान करत असताना लोणावळा डायग्नोस्टिक सेंटर कडून सिटी स्कॅनच्या नावाखाली कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची लूटमार करत असल्याची लेखी तक्रार लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी घटनेचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी लेखी स्वरूपात पुजारी यांनी केली आहे. कोरोना संसर्ग, कडक निर्बंध आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्यांचा कणा मोडला असून आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना मदतीची गरज असताना लोणावळा डायग्नोस्टिक सेंटर कडून कोरोना रुग्ण व नॉन कोरोना रुग्ण यांच्याकडून सरसकट 4500 ते 6000 रुपये सिटी स्कॅनच्या नावाखाली आकारले जात आहे.
कोरोना रुग्णांकडून 2500 रुपये व नॉन कोरोना रुग्णांकडून 4500 रुपये आकारण्याचे आदेश असताना लोणावळा डायग्नोस्टिक सेंटरकडून 2000 रुपये जास्तीचे आकारण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांची उघड उघड लूटमार होत आहे. आणि ज्या रुग्णांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून या डायग्नोस्टिक सेंटरकडून सिटी स्कॅनच्या नावाखाली जास्तीचे रुपये आकारले आहेत त्यांचे रुपये त्यांना या डायग्नोस्टिक सेंटरने परत करावे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यमान नगरसेवक श्रीधर पुजारी यांनी प्रतिनिधिशी बोलताना केली.