Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा धबधब्यात दुर्दैवी घटना : पाच जण वाहून गेले, तीन मृतदेह सापडले..

लोणावळा धबधब्यात दुर्दैवी घटना : पाच जण वाहून गेले, तीन मृतदेह सापडले..

लोणावळा ( श्रावणी कामत ) ३० जून आज लोणावळ्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारी ३ वाजता, हडपसर पुणे येथील लियाकत अन्सारी व युनुस खान हे आपल्या १७ ते १८ कुटुंब सदस्यांसह वर्षाविहारासाठी लोणावळा, भुशी डॅमच्या पाठीमागील दुर्गम धबधब्याकडे गेले होते. पावसामुळे पाण्याचा जोर अचानक वाढल्याने त्यांच्या कुटुंबातील १० जण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी ५ जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडण्यात यश आले, परंतु उर्वरित ५ जण प्रवाहात वाहून गेले.वाहून गेलेल्यांपैकी तीन मृतदेह सापडले आहेत , साहिस्ता लियाकत अन्सारी , वय ३७ वर्ष अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी , वय १३ वर्ष उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी, वय ८ वर्ष , हे सर्वजण सय्यदनगर, पुणे येथील रहिवासी आहेत.
अदनान अन्सारी व मारिया अन्सारी हे दोन व्यक्ती अद्याप बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध शिवदुर्ग मित्र मंडळ व आय.एन. शिवाजी यांच्या मदतीने सुरू आहे.हा परिसर भारतीय रेल्वे विभाग व भारतीय वन खाते यांच्या अखत्यारीत असल्याने रेल्वे प्रशासन, वन विभाग व नगर पालिका यांच्या सहकार्याने शोधकार्य व योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात येत आहे की, अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये. भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात येणाऱ्या पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे , लोणावळा व खंडाळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहार व पर्यटनाचा आनंद घ्यावा. निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये, असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page