लोणावळा : ( श्रावणी कामत ) लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अशोक साबळे यांच्या संकल्पनेतून लोणावळा नगरपरिषद व स्माइल वेलनेस फाउंडेशन यांनी एकत्र येऊन लोणावळा नगरपालिकेच्या इयत्ता 6 वी ते 8 वीच्या 289 विद्यार्थ्यांसाठी सायन्स मिस्ट्री शोचे आयोजन केले. हा कार्यक्रम दिनांक 22 जुलै ते 24 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला.
या शोमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध रहस्यांबद्दल माहिती देण्यात आली. विज्ञानाचे विविध प्रयोग, सादरीकरणे व इंटरअॅक्टिव्ह सत्रे आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे आकलन सोपे आणि मनोरंजक बनविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवून विज्ञानाचे महत्व पटवून दिले गेले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व विज्ञानाविषयी आपली जिज्ञासा वाढवली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात योगदान मिळते व त्यांची सृजनशीलता आणि तांत्रिक ज्ञान वाढते. लोणावळा नगरपरिषद आणि स्माइल वेलनेस फाउंडेशन यांनी घेतलेल्या या उपक्रमाचे पालक आणि शिक्षकांनीही कौतुक केले.
या शोच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याधिकारी मा. अशोक साबळे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात.