जी वॉर्ड टेबल लँड परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे वाहनचालक आणि नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत...
लोणावळा : लोणावळा नगरपरिषद मुख्यालयाच्या अगदी जवळ, अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावर गेली दोन वर्षे मोठा खड्डा कायम आहे. या ठिकाणी दिवसभर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते, तरीदेखील नगरपरिषद प्रशासनाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
भाजी मार्केटजवळ सतत गर्दी असते. त्यामुळे नागरिक, पादचारी आणि वाहनचालकांना या अपुर्या रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यात साचलेले पाणी व चिखल यामुळे वाहने जाताना पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल उडतो. परिणामी, अनेक वेळा नागरिक आणि वाहनचालकांमध्ये वाद-भांडणांच्या घटना घडत आहेत.
जी वॉर्ड टेबल लँड परिसरातही अशाच स्वरूपाची स्थिती असून, ठिकठिकाणी रस्ते उखडलेले आणि खड्ड्यांनी भरलेले आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ होत असल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
स्थानिक व्यापारी आणि विक्रेते यांच्यामध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. एका विक्रेत्याने संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले की..“हा खड्डा कित्येक वेळा दाखवूनही नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे. पावसात संपूर्ण रस्ता पाण्याने भरतो आणि आम्हाला ग्राहकांसमोर अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्रास अजून किती दिवस सहन करायचा?”
या प्रश्नाकडे लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपरिषद मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या या परिसराची ही दयनीय अवस्था, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे, आणि याआधी काही अनुचित प्रकार घडण्याआधी प्रशासनाने वेळीच जागे होणे आवश्यक आहे.