लोणावळा ( प्रतिनिधी श्रावणी कामत ))30 जून: भुशी धरणाच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याच्या प्रवाहातून एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. या घटनेत लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळपासून लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे धरण परिसरातील पाणीपातळी वाढली आहे.
सकाळच्या सत्रात, एकाच कुटुंबातील काही सदस्य रेल्वे विश्रांतीगृहाजवळील धबधब्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत असताना, पावसाच्या तीव्रतेमुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे या कुटुंबातील पाच जण, ज्यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे, पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम आणि स्थानिक युवकांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली आहे. पर्यटकांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.