लोणावळा : ( श्रावणी कामत ) जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त लोणावळा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये शंभर झाडांची लागवड आज करण्यात आली. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीयर, लोणावळा महाविद्यालय, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, सिंहगड महाविद्यालय व रोटरी क्लब निगडी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन यांच्या वतीने लोणावळा शहरामध्ये 1000 झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी गुरुकुल विद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली व आज जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त सादर लोणावळा महाविद्यालयाच्या मैदानामध्ये शंभर झाडांची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेले प्रत्येक झाड असोसिएशनचे पदाधिकारी व मान्यवर यांनी दत्तक घेतले असून ते जगवण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सदर वृक्षारोपणा करिता दोन दिवसापासून तयारी करण्यात आली होती व त्याकरिता मैदानाच्या सभोवताली खड्डे करण्यात आले होते.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशन अध्यक्ष दिनेश राणावत, उपाध्यक्ष वीरेंद्र पारेख,लोणावळा शहर पोलीस स्टेशन चे IPS सत्यसाई कार्तिके,लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र देशमुख, विश्वस्त व आर्किटेक्ट दत्तात्रय येवले, विकी पालरेचा, राजेश चव्हाण, गणेश भालेराव, गंगाराम मावकर, हेमंत बनकर, अर्पणा गावडे, पूजा छलानी, शिवा राठोड, आशिष पाॅन, डॉ. दिगंबर दरेकर यांच्या सह हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशनचे सदस्य रोटरी क्लब निगडीचे सदस्य सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील शिक्षक व लोणावळा महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य नरेंद्र देशमुख म्हणाले, जागतिक तापमान वाढीचे समस्या ध्यानात घेता वृक्षारोपण करण्यासोबत वृक्ष संगोपन ही संकल्पना राबवणे ही काळाची गरज बनली आहे.
लावलेले प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी घेतली गेल्यास परिसर हिरवागार होण्यास नक्कीच मदत होणार आहे. आज झालेल्या वृक्षारोपणामध्ये झाडे लावण्या सोबत त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील घेण्यात आली आहे.