Friday, November 22, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळा लाईट चा शॉक लागून 13 वर्षीय बालकाचा मृत्यू...

लोणावळा लाईट चा शॉक लागून 13 वर्षीय बालकाचा मृत्यू…

लोणावळा : शहरात दुसऱ्यांदा स्विमिंगपूल ठरला मृत्यूला कारणीभूत. गुरुवारी तुंगार्ली येथील बंगल्यावर घडली धक्कादायक घटना. स्वीमिंगपूल मध्ये खेळल्यानंतर ओल्या अंगाने शेजारच्या लाईटला हात लावल्यानंतर एका 13 वर्षाच्या बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे . गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात तुंगार्ली येथील क्रेसेंन्ट बंगला येथे घडला . याप्रकरणी मोहमद साजीद खान ( वय 56 , रा . भायखळा , मुंबई ) यांनी शहर पोलिसांना माहिती दिली आहे . हरुन मसुद वाली ( वय 13 , मुंबई ) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे .

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहमद खान व त्यांचे नातेवाईक हे लोणावळ्यातील क्रेसेंन्ट व्हिला या बंगल्यात आले होते . रात्री साडेआठ च्या सुमारास खान व त्यांच्या बहिनीची मुले स्विमिंगपूल मध्ये खेळत होती . त्यावेळी हरुन हा पाण्याच्या बाहेर आला व खेळता खेळता स्विमिंगपूल च्या बाजुला असलेल्या लाईटला त्याने पकडले असता त्याला लाईटचा शॉक लागल्याने तो बेशुद्ध झाला . उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मयत दाखल करण्यात आले आहे.

लोणावळा शहरात पंधरा दिवसापूर्वीच एका दोन वर्षाच्या बालकाचा स्वीमिंगपूल च्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता . त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आहे . लोणावळा शहरातील खाजगी बंगल्यांमध्ये असलेले स्विमिंगपूल व त्याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला असून लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद या अनाधिकृत स्विमिंगपूल ची तपासणी करत काही ठोस पाऊल उचलणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page