if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
लोणावळा आणि खंडाळा शहरांसाठी विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश..
मुंबई : दि. २० ऑगस्ट: पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळा ही राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे असून, पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने आवश्यकतेनुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. लोणावळा शहरासाठी ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि खंडाळा भागासाठी ५ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील समिती कक्षात लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीत आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता , माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक भरत हरपुडे, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक भूसंपादनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहकार्याने तातडीने भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.
लोणावळा शहरातील दीर्घकालीन लिजवर दिलेल्या मालमत्तांची मुदत संपल्यामुळे त्यांच्याबाबत नवीन धोरण ठरविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच, शहरातील स्थानिक रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायावर परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन ओला आणि उबरसारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
लोणावळा शहराच्या विकास आराखड्याचा आढावा घेताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांसाठी वाढीव एफएसआय देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पवार यांनी दिले. याशिवाय, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.