लोणावळा (प्रतिनिधी) : झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जखमी फिर्यादीस चक्क पोलीस स्टेशन आवारात पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी केतन दिपक फाटक (वय 30, रा. रचना गार्डन, लोणावळा ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले आहे.
याप्रकरणी सचिन सदानंद घोणे आणि लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मयूर अबणावे यांनी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी केतन फाटक व सचिन घोणे यांच्यात दुपारी भांडण झाले होते. त्याच भांडणाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी सचिन हे लोणावळा शहर पोलीस स्टेशनला आले असता त्यांना पाहून आरोपी केतन याने ठाणे अंमलदार कक्षातून बाहेर येऊन पोलीस स्टेशन आवारात फिर्यादी व त्याच्या बरोबर असणाऱ्यास आपखुशीने लाकडी दांडक्याने मारहाण केली त्यात फिर्यादी यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला,तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पोलीस नाईक हे सरकारी कर्मचारी असल्याची जाणीव असूनही आरोपी याने जाणून बुजून त्यांना धक्का देऊन खाली पाडले त्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गु.र.नं. 141/2022 भा. द. वी. कलम 353,325,324 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.