Wednesday, December 18, 2024
Homeक्राईमलोणावळा: सोनसाखळी हिसकावणाऱ्या घटनांमध्ये वाढ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण..

लोणावळा: सोनसाखळी हिसकावणाऱ्या घटनांमध्ये वाढ; महिलांमध्ये भीतीचे वातावरण..

लोणावळा: मागील काही दिवसांमध्ये लोणावळा शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रायवुड, भांगरवाडी, आणि वलवन बापदेव रोड येथे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढल्याच्या घटना घडल्या आहेत.
वलवन बापदेव रोड येथे घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये दुचाकीवरून आलेले दोन चोरटे एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून जात असल्याचे स्पष्ट दिसते. याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वीही दुकानातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली होती.
चोरट्यांचा पद्धतशीर डाव..दुचाकीवरून फिरणारे मध्यम वयाचे चोरटे डोक्यावर माकडटोपी, मास्क किंवा हेल्मेट घालून येतात. रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या किंवा वॉकिंगसाठी बाहेर पडलेल्या महिलांना एकट्या पाहून गाडीवर मागे बसलेला चोरटा गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढतो.
महिला घाबरलेल्या, पोलिस गस्त वाढवण्याची गरज…
गर्दीच्या भागांमध्ये दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सकाळी व सायंकाळी वॉकसाठी किंवा मंदिरात जाणाऱ्या महिलांना असुरक्षित वाटत आहे. पोलिसांनी सकाळी आणि सायंकाळी गस्त वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
पोलिसांचे आवाहन:
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि महिलांनी घराबाहेर जाताना अंगावर मोलाचे दागिने न घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू..
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनांमध्ये सामील असलेल्या टोळीचा माग काढण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना राबवण्याची गरज असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page