Friday, June 20, 2025
Homeक्राईमलोणावळ्यातील बंद घरात घरफोडी; दोन आंतरराज्यीय सराईत चोरटे अटकेत, ३० लाखांचा ऐवज...

लोणावळ्यातील बंद घरात घरफोडी; दोन आंतरराज्यीय सराईत चोरटे अटकेत, ३० लाखांचा ऐवज हस्तगत..

लोणावळा : जुन्या खंडाळा रोड परिसरातील एका बंद घरात झालेल्या घरफोडीचा छडा लावत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोन आंतरराज्यीय सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ९ जून २०२५ रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी बिना मुळे (वय ६५) यांनी घरफोडीची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्या मुलीच्या घरी गेल्यामुळे घर बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करत ४७ तोळे सोने आणि २ किलो चांदी असा सुमारे २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते. लोणावळा स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तीन संशयित चोरटे रेल्वेने पिंपरी-चिंचवडकडे जाताना दिसले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेला १६ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार वडगाव मावळ येथे सापळा रचून चंद्रकांत ऊर्फ चंदू माने (वय ३२, रा. चिंचवडगाव) आणि धनंजय काळे (वय २०, रा. चिंचवडगाव) या दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पुढील तपासात त्यांनी चोरी केलेला ऐवज दीपक मंदगे (रा. कर्जत) आणि कैलास जाट (रा. वाशी) यांच्या मदतीने विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यातून ३४ तोळे सोने व २ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

मुख्य आरोपी चंद्रकांत माने याच्यावर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा ठिकाणी ५० हून अधिक गुन्हे दाखल असून तो काही दिवसांपूर्वीच चेन्नई येथील गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता.

ही संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पोलीस निरीक्षक राजेश रामाधरे, पोसई अभिजीत सावंत, सपोनि राहुल लाड, पोसई रमेश भिसे, सूर्यकांत वाणी, पोलीस अंमलदार राहुल पवार, सागर नामदास, धीरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, मुकुंद कदम, संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांच्या टीमने बजावली असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्तपणे करत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page