Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात इलेक्ट्रिक स्कूटीच्या आगीत घराचे मोठे नुकसान, सुदैवाने मोठा अनर्थ टळला..

लोणावळ्यात इलेक्ट्रिक स्कूटीच्या आगीत घराचे मोठे नुकसान, सुदैवाने मोठा अनर्थ टळला..

लोणावळा : कुसगाव बु.येथील ओळकाईवाडी मध्ये काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वसीम अकबर अत्तार यांच्या घरासमोर उभी असलेली इलेक्ट्रिक स्कूटी अचानक पेट घेतल्यामुळे संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेने परिसरात खळबळ उडवली असून, नागरिकांमध्ये इलेक्ट्रिक स्कूट्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
स्कूटीचा पेट इतका भयंकर होता की काही क्षणांतच घरा बाहेर ठेवलेले वाशिंग मशीन, कपडे आणि इतर सामान जळून खाक झाले. आगीच्या उष्णतेमुळे घरातील टीव्ही आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खराब झाल्या आहेत. घरातील सदस्यांना याचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे, आगीच्या वेळी घरात तीन महिला आणि एक दिव्यांग मुलगी होती, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शेजाऱ्यांनी तत्परतेने धाव घेऊन पाणी टाकून आग विझवली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा आग आणखी वाढून घराचं मोठं नुकसान होऊ शकलं असतं. या घटनेनंतर प्रचंड धुरामुळे परिसरात घबराट पसरली होती.
वसीम अकबर अत्तार यांची ही इलेक्ट्रिक स्कूटी अचानक का पेट घेतली याबाबत काही नागरिकांनी स्कूटीच्या बॅटरीमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.इलेक्ट्रिक वाहने जरी पर्यावरणपूरक असली तरी त्यांच्याशी संबंधित सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page