विद्यार्थ्यांच्या चारित्र्य व विचारविकासासाठी भगवद्गीतेचे २००० प्रती वाटप .
प्रतिनिधी : श्रावणी कामत.
लोणावळा : विद्यार्थ्यांच्या मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्सच्या वतीने “गीता बोले मनाशी – विद्यार्थी काळातील संवाद” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत भगवद्गीतेच्या २००० प्रती शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आल्या.
भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून, ती आचारधर्म, नैतिक मूल्ये, आत्मज्ञान व कर्तव्यबुद्धी यांचे मार्गदर्शन करणारी अमूल्य साहित्यसंपदा आहे. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी गीतेतील तत्त्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्यनिर्मिती, मनोबल वाढ आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात सहभागी झालेल्या शाळांमध्ये ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल, गुरुकुल हायस्कूल, व्ही.पी.एस. हायस्कूल, डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूल आणि सिंहगड हायस्कूल यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ लोणावळा लिजेंड्सच्या अध्यक्ष सौं वैशाली साखरेकर, सचिव लायन मिनाक्षी गायकवाड, कोषाध्यक्ष लायन नूतन घाणेकर, प्रोजेक्ट इनचार्ज लायन कीर्ती आगरवाल आणि लायन सुरेश गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.
या प्रसंगी लायन उमा मेहता, लायन एम.जे.एफ. राजेश मेहता, लायन विजय रसाळ, लायन विवेक घाणेकर, लायन आय.पी.पी. गोरख चौधरी, लायन धनंजय साखरेकर, लायन मनोज कदम आणि लायन उदय पाटील यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेच्या प्रती स्विकारताना समाधान व्यक्त केले असून, गीतेतील विचार त्यांच्या आत्मिक आणि बौद्धिक उन्नतीस निश्चितच सहाय्यक ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.