Wednesday, July 30, 2025
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार; तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा..

लोणावळ्यात तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार; तिघा अज्ञातांविरोधात गुन्हा..

तुंगारली रस्त्यावर तरुणीचे अपहरण, कारमध्ये अत्याचाराची संतापजनक घटना..

लोणावळा, ता. २६ – लोणावळा शहरात एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून तीन अज्ञात व्यक्तींविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तुंगारली रस्त्यावरून जात असताना तिघा अज्ञातांनी तरुणीचे तोंड दाबून तिचे अपहरण केले. कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचा मोबाईल काढून घेतला आणि तिचे दोन्ही हात बांधून विविध ठिकाणी नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नांगरगावमधील दत्त सोसायटीजवळील एका रस्त्यावर सदर तरुणी संशयास्पद अवस्थेत आढळून आली. स्थानिकांनी तिला जवळच्याच मंदिरात आश्रय दिला. माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ताब्यात घेतले.

तिच्या जबाबात, अत्याचार करणारे आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून तीनही अज्ञात होते, असे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असून, याप्रकरणी विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकारामुळे लोणावळा शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. लोणावळा पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली असून तपास वेगाने सुरू आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page