सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यजित कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्यात पानटपऱ्यांवर धडक कारवाई; संशयित पदार्थ जप्त..
प्रतिनिधी : श्रावणी कामत
लोणावळा शहर व ग्रामीण भागात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पानामध्ये अमली पदार्थ मिसळून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विविध पानटपऱ्यांवर धडक कारवाई करत संशयित पदार्थ जप्त केला.
सदर कारवाईत प्रेम बाळासाहेब जाधव (रा. शिलाटणे) यांच्या चैतन्य पान शॉप (रायवूड मंदिर रोड), नरेश नगाराम सूर्यवंशी (रा. लोणावळा) यांच्या नरेश पान शॉप, विनायक शंकर दहिभाते (रा. कामशेत) यांच्या साईरतन पान शॉप, निखील हरिदास आझाणकर (रा. पांगोळली) यांच्या महालक्ष्मी पान शॉप आणि राहुल सुनिल शेलार (रा. औंढे) यांच्या पैलवान पान शॉप या पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पानामध्ये मिसळण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर व अन्य संशयित साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी हे नमुने अन्न प्रशासन, पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी पानटपरी चालकांना १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, पानटपऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, वेळेत बंद करणे आणि ‘१८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विक्री केली जाणार नाही’ असा फ्लेक्स बोर्ड लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच, लोणावळा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शाळा व महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरातील पानटपऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस अंमलदार शेखर कुलकर्णी, हनुमंत शिंदे, आदित्य भोगाडे, अंकुश पवार व पवन कराड यांनी केली.