Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपरी हातगाडी व वाहन चालकांवर कारवाई…

लोणावळ्यात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपरी हातगाडी व वाहन चालकांवर कारवाई…

लोणावळा (प्रतिनिधी): शहरात पोलीस, नगरपरिषद व आर. टी. ओ. यांनी संयुक्त कारवाई करत नियम न पाळणारे टपरी व हातगाडी धारक, रहदारीला अडथळा ठरतील अशी वाहने उभी करणारे वाहन चालक, रस्त्यावर दुकानांच्या पाट्या लावणारे व्यवसायिक यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.त्यानुसार काल गुरुवारी लोणावळा बाजार भाग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद, लोणावळा शहर पोलीस यांनी 63 जणांवर कारवाई करत 48 हजार 800 रूपये दंड वसूल केला आहे.
अचानक ही कारवाई मोहीम राबविण्यात आल्याने व्यवसायिक व टपरी धारकांची धांदल उडाली. तर यापुढील काळात देखील लोणावळा शहरात व हायवेवर अनधिकृतपणे फळे विकणारे व्यवसायिक,अन्न पदार्थ विक्री करणारे स्टॉल धारक, रस्त्यावर कशाही गाड्या लावणारे चालक यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असल्याने येथे सतत पर्यटकांची वर्दळ असते, त्यातच अशा अतिक्रमणे करणाऱ्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून या कारवायांमध्ये सातत्य ठेवत नियम न पळणाऱ्यांवर अधिक कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी सांगितले.
गुरुवारी केलेल्या कारवाई मध्ये 63 पैकी 32 केसेस नो पार्किंगच्या आहेत तर 31केसेस रस्त्यावर फळे विकणारे विक्रेते,रस्त्यावर बोर्ड लावणारे दुकानदार, रस्त्यावर अन्न पदार्थ विकणारे स्टॉल धारक यांच्यावर करण्यात आल्या आहेत.
सदर कारवाई लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डूबल, पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर, शकिल शेख, वाहतूक विभागाचे अनिल शिंदे, सचिन कडाळे यांच्या पथकाने केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page