Thursday, November 21, 2024
Homeपुणेलोणावळालोणावळ्यात शिवजयंती निमित्त शेकडो शिव ज्योतिचे स्वागत…

लोणावळ्यात शिवजयंती निमित्त शेकडो शिव ज्योतिचे स्वागत…

लोणावळा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातील विविध गावातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरून शिव ज्योत प्रज्वलित करत त्या लोणावळा शहरामध्ये आणल्या होत्या. लोणावळा शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आलेल्या सर्व शिवज्योतींचे लोणावळा शहरांमध्ये हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर यांच्या वतीने तसेच शिवसेना शिवजयंती उत्सव मंडळ लोणावळा यांच्या वतीने जयचंद चौक या ठिकाणी स्वागत करण्यात आले.
लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. मागील दोन-तीन दिवसांपासून शेकडो शिवजयंती उत्सव मंडळांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभरातील विविध गडकिल्ल्यांवर गेले होते. त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेऊन शिवज्योती प्रज्वलित करत त्या आज सकाळी सहा वाजल्यापासून लोणावळा शहरात येण्यास सुरुवात झाली. सर्व भागातून शिवज्योती सर्वप्रथम लोणावळा शहरात आणल्या जातात.या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर या शिवज्योती आपापल्या गावांमध्ये घेऊन जाण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे. वाजत गाजत ढोल ताशांचा निनाद व डीजे च्या आवाजात या शिवज्योतींची मिरवणूक मावळा पुतळा चौक लोणावळा येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान तसेच भांगरवाडी इंद्रायणी पूल येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आणण्यात येत होत्या. चौकामध्ये काही काळ मंडळाचे कार्यकर्ते विविध खेळ सादर करत पुढे सरसावत असल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. शिवजयंतीच्या निमित्ताने लोणावळा शहर शिवमय झाले होते. सर्वत्र भगवे झेंडे, भगवे फेटे, भगव्या टोप्या असे चित्र पाहायला मिळत होते. अतिशय उत्साहामध्ये व मोठ्या जल्लोषात तिथीप्रमाणे
आलेली शिवजयंती आज साजरी करण्यात आली. शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोणावळा शहरामध्ये व परिसरातील ग्रामीण भागात गावोगावी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वलवन क्रीडा संघाचा अनोखा विक्रम..

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध गडकिल्ल्यांवरून शिवजयंती उत्सव मंडळाचे कार्यकर्ते धावत शिवज्योत घेऊन लोणावळा शहरापर्यंत येत असतात. लोणावळा शहरातील वलवण या गावातील, वलवण क्रीडा संघ मागील तीन वर्षापासून सातत्याने दूरचे पल्ले पार करत शिवज्योत लोणावळा शहरामध्ये घेऊन येत आहे. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सिंधुदुर्ग किल्ला ते लोणावळा असा मोठा पल्ला पार करत वलवण क्रीडा संघ शिवज्योत लोणावळा शहरामध्ये घेऊन आले आहे. यापूर्वी त्यांनी पन्हाळगड ते वलवण विशालगड ते वलवण असे पल्ले पार केले आहेत.

कुसगाव शिवजयंती उत्सव मंडळाचे पारंपारिक उपक्रम..

कुसगाव शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मावळा पुतळा चौक ते कुसगाव दरम्यान पायी पालखी द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये सर्वजण पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते तसेच वाद्य देखील ढोल ताशांची पारंपरिक पद्धतीने वाजवण्यात आले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page