लोणावळा दि.19: लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS नवनीत कॉवत यांच्या पदोन्नती सत्कार सोहळ्याचे लोणावळ्यात आयोजन.लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कॉवत यांची नुकतीच उस्मानाबाद जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल लोणावळा शहर पोलीस ठाणे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे, कामशेत पोलीस ठाणे व वडगाव पोलीस ठाणे या चार पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या भव्य दिव्य सत्कार सोहळ्याचे नियोजन लोणावळ्यात करण्यात आले होते.
पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व इतर स्तरावरील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला.यावेळी उपस्थितांकडून IPS नवनीत कॉवत यांना फेटा घालून मावळची शान असलेली बैलगाडी भेट देण्यात आली.
IPS कॉवत हे भारतीय पोलीस सेवेत रुजू होताच त्यांची प्रथम पोस्टिंग लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावर झाली होती. त्यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात मावळातील गुन्हेगारीला चाप बसविला आहे. कामाच्या बाबतीत सक्त व कठोर असणारे कॉवत हे समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी निपक्षपाती व प्रेमळ अधिकारी होते.
त्यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात मावळातील गुन्हेगारीला आळा घालताना गांजाची तस्करी, बनावट दारू तयार करणे, गुटखा कारखाना यासारखे बेकायदेशीर धंदे उघडकीस आणून धडाकेबाज कारवाई केली असून मावळात आश्रयासाठी आलेल्या फरार आरोपींना पकडण्याची प्रशंसनीय कामगिरी करत मावळात पोलीस प्रशासनाची छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून आज त्यांचा पदोन्नती सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला आहे.
या सोहळ्याचे प्रास्ताविक लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले तर कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, आर. पी. आय. चे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षा कचरे पाटील व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी यांनी कॉवत यांना शुभेच्छा देत त्यांच्याप्रति आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस कर्मचारी अमोल कसबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.