Tuesday, September 17, 2024
Homeपुणेलोणावळालोहगड किल्ल्यावर उर्स निमित्त 144 कलम लागू…

लोहगड किल्ल्यावर उर्स निमित्त 144 कलम लागू…

कार्ला : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूसाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी लोहगड व घेरेवाडी परिसरात 25 जानेवारी रोजी मध्यरात्री पासून ते 26 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावरील हजी हजरत उमरशावली बाबा दर्गा उरूस साजरा करण्यासाठी 25 जानेवारी रोजी हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोहगड व घेरेवाडी या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम,व्हाट्सअप,ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाहीत याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप अॅडमिनची असेल. लोहगड व घेरेवाडी हद्दीतील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील.
कोणताही कार्यक्रम हा पोलीस विभागाच्या व इतर विभागाच्या आवश्यक पूर्वपरवानगी शिवाय करण्यात येवू नये. समाज भावना भडकवतील अशा घोषणा, भाषण करू नये.या परिसरात मोर्चा, आंदोलन करण्यात येवू नये. प्रतिबंधित कालावधीत धार्मिक विधीसाठी पशु पक्षांचा बळी दिला जाऊ नये. ऐतिहासिक व सार्वजनिक वस्तूंचे नुकसान करण्यात येवू नये. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page