मावळ (प्रतिनिधी): वडगाव शहरातील दिव्यांग बांधव भगिनींना अपंग कल्याण निधीतून चार लाख दहा हजार रुपये निधीचे वाटप करण्यात आले.
वडगाव नगरपंचायत सन 2022/2023 मधील उत्पन्नाच्या 3% अंध अपंग कल्याण निधी अंतर्गत नगरपंचायत मध्ये सन 2023 मध्ये नोंदणी केलेल्या 82 लाभार्थ्यांना नगरपंचायत कार्यालयात प्रत्येकी रुपये 5000 चा धनादेश नगराध्यक्ष मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी नगरसेवक राजेंद्र कुडे, प्रवीण चव्हाण, दिलीप म्हाळसकर, मंगेश खैर, वडगाव नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी नागरिक उपस्थित होते.
नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने अपंग कल्याण योजनेतून आज शहरातील जवळपास 82 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये याप्रमाणे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.
यावेळी दिव्यांग लाभार्थी यांना संबोधित करताना नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी आवाहन केले की,आपल्या शहरातील जवळपास राहणारे जे कोणी दिव्यांग बांधव असतील त्यांनी येणाऱ्या कालावधीत वडगाव नगरपंचायत कार्यालयात संपर्क साधून या योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी व संबधित लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.