मावळ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील साहित्यिक, कवी, लेखक, ऐतिहासिक, पर्यावरण, शाहीर, शैक्षणिक, चारोळी, प्रबोधनकार, व्याख्याते त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून गौरविण्यात आले.
गुरूवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना, वडगाव शहरामधून मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकरजी ओव्हाळ, अजितराव देशपांडे, बाळासाहेब बोरावके, संदीपजी औटी, अयुबजी पिंजारी सर, गिरीशजी गुजराणी, वनश्रीताई जोगळेकर, रोहिणीताई भोरे, चेतनजी घाग, जिगरजी सोलंकी, अनिलजी ओव्हाळ यांसह अनेक मान्यवरांनी यावेळेस मार्गदर्शन तसेच आपापल्या कलेचे सादरीकरण केले.
तसेच वडगाव शहरातील बाजारपेठेत आणि आठवडे बाजारात मराठी भाषे संदर्भात प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम राबवून महिलावर्ग तसेच नागरिकांकडून प्रश्नांची उत्तरे घेऊन त्यांना मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने अबोली मयूर ढोरे यांनी सर्वांना आकर्षक भेटवस्तू देऊन राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा सौ अबोली ढोरे तसेच माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सर्व सन्माननीय मान्यवरांना सन्मानित करून सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मोरया प्रतिष्ठानचे पदाधिकारी महिला संचालिका सदस्या मोठया संख्येने उपस्थित होत्या.