वडगाव मावळ दि.16 : वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील माळेगाव बु. तळपेवाडी येथील महिलेच्या डोक्यात वार करून हत्त्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व वडगाव मावळ पोलीस पथकाने अवघ्या दोन दिवसातच ताब्यात घेतले आहे.
आरोपी वसंत राघू माळी ( वय 28, रा. तळपेवाडी ) असे आरोपीचे नाव आहे.याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याने फासाबाई हिची हत्त्या जमिनीच्या जुन्या वादातून केल्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार 13 मार्च रोजी मयत फासाबाई साळू निसाळ व तीचे पती साळू मारुती निसाळ हे शेतावर काम करत असताना फासाबाई या तेथून 2 कि.मी.अंतरावरील गोठ्यात जाणवरांना पाणी पाजण्यासाठी गेली असता त्या गोठ्यात अगोदरच धाक लावून बसलेला तिचा चुलत भाऊ आरोपी वसंत राघू माळी याने फासाबाई हिच्या डोक्यावर, तोंडावर व हातावर धारदार कोयत्याने वार करून तीची निर्घृण हत्त्या केली व तेथील प्लास्टिक ड्रममधील पाण्याने रक्ताचे हात धुवून गोठ्याच्या मागील बाजूस दोन कि.मी. अंतरावर जंगलात असलेल्या ओढ्यावर त्याने त्याच्या अंगातील रक्ताने माखलेले शर्ट अर्धवट धुतले व खुनात वापरलेला धारदार कोयता तिथेच दगडाच्या खाली लपवून ठेवला व तेथून त्याच्या राहत्या घरी निघून गेला.
आरोपीने खुनातील सर्व पुरावे नष्ट केले तरीही स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव मावळ पोलीस पथकाने मोठया शिताफिने तपास करून आरोपीस अटक केले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
मयत फासाबाई यांचे पती साळू निसाळ यांनी याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये 13 मार्च रोजी फिर्याद दिल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मितेश घटटे यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेद्र पाटील, वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे, वडगाव मावळ पोलीस उपनिरीक्षक सतोष चामे, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे रामेश्वर धोगंडे, अमोल,प्रकाश वाघमारे , प्रमोद नवले , सुनिल जावळे ,प्राण येवले व वडगाव पोलीस स्टेशनचे श्रीशैल कंटोळी, सचिन काळे , अमोल कसबेकर, मनोज कदम, संजय सुपे, अमोल तावरे , शशिकांत खोपडे, भाऊसाहेब खाडे, लोणावळा उपविभागीय कार्यालयाचे संतोष वाडेकर , होमगार्ड सुरेश शिंदे , नवनाथ चिमटे यांच्या पथकाने ही कौशल्यपूर्ण कामगिरी केली आहे.