लोणावळ्याचे सुपुत्र ॲड अशफाक. काझी यांचे न्याय क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय..
लोणावळा : पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अशफाक काझी (एस. ए. काझी) यांना ‘सिनिअर लॉयर्स अवॉर्ड – २०२५’ प्रदान करण्यात आला. पुण्यात पार पडलेल्या भव्य समारंभात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
ॲड. अशफाक काझी हे मूळचे लोणावळ्याचे रहिवासी असून, गेली ४७ वर्षे पुणे व वडगाव मावळ परिसरात कायदा क्षेत्रात कार्यरत आहेत. सिव्हिल लिटिगेशन, मालमत्ता वाद, बंदी आदेश, जाहीर घोषणा व वसुलीचे दावे यामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे.
त्यांनी पुण्यातील नामांकित आय. एल. एस. लॉ कॉलेजमधून शिक्षण घेतले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध नोकऱ्या करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या वकिलीच्या कारकिर्दीची सुरुवात सुप्रसिद्ध एस. के. वैद्य चेंबर्समध्ये अॅड. एस. ए. रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
सिव्हिल प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्यातील त्यांचा सखोल अभ्यास, तसेच न्यायालयीन मांडणीतील स्पष्टता यामुळे त्यांनी वकिलीच्या क्षेत्रात स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी अनेक नवोदित वकिलांना मार्गदर्शन आणि आर्थिक मदत केली असून, आजही ते ही मदत अविरतपणे सुरू ठेवत आहेत.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विधिज्ञ आज विविध न्यायिक सेवांमध्ये कार्यरत आहेत. यामध्ये न्याय दंडाधिकारी (प्रथम वर्ग) मोहम्मद फकीह यांचे नाव विशेष उल्लेखनीय आहे. ते ॲड. अशफाक काझी यांचे ज्युनियर वकील असून, त्यांची नुकतीच न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.
ॲड. अशफाक काझी यांनी पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून नैतिक मूल्यांचे जतन करण्यासाठीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गरजू आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये विनामूल्य विधी सेवा पुरवली आहे.
सुमारे पाच दशकांचा अनुभव, प्रामाणिक दृष्टिकोन, समाजासाठीची बांधिलकी आणि कायद्यातील सखोलता यामुळे ॲड. अशफाक काझी यांचे नाव न्यायव्यवस्थेतील आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून घेतले जाते.