Sunday, December 22, 2024
Homeपुणेलोणावळावाकसई येथे सकल मराठा समाज मावळच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे भव्य...

वाकसई येथे सकल मराठा समाज मावळच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत…

लोणावळा : महाराष्ट्र शासनाने पाठवलेल्या शिष्टमंडळासोबतची चर्चा निष्फळ ठरल्या नंतर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आरक्षण लढ्यासाठी बाहेर पडलेलं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने पुढं सरकल आहे. त्यापूर्वी, जोवर शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोवर गप्प बसणार नाही. पण आपल्यात एकजूट राहुद्या, हे आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढं न्यायचं आहे. शब्द मोडू नका, मराठा समाज करोडोंच्या संख्येने मुंबईत एकत्र आला आणि शांततेत आरक्षण घेऊन गेला हा इतिहास घडला पाहिजे, असे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यातील त्यांच्या सभेत केले.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे 25 जानेवारी रोजी वाकसई या ठिकाणी मुक्काम स्थळी त्यांचे मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या सभेचे आयोजन यावेळी करण्यात आले. दि.25 रोजी सकाळी सकाळी 9 वाजता सभा सुरु झाली. यासभेत महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. यावेळी मराठा बांधवांना संबोधित करताना ” महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची अन जनता पण आमचीच असे गरजत आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबणार नाही.आपल्याला शांतपणे हे आंदोलन करायचे आहे. त्यामुळे सरकारला कळेल की जेव्हा मराठा एकवटतो तेव्हा तो इतिहास घडवतो असे बोलत सर्वात मोठी मागणी मराठ्यांना आरक्षण मिळावे असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळातील वाकसई येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाड पादुका स्थान शेजारी मनोज जरांगे यांचा मुक्काम व सभा होणार असल्यामुळे. येथील सुमारे 130 एकर जागा साफसफाई करून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आली. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाचे हजारो तरुणांनी या ठिकाणी कर्तव्य भावनेतून मदत कार्य केले.
तसेच लोणावळा उपविभागाचे पोलीस अधीक्षक सत्यसाई
कार्तिक, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांसह अनेक पोलीस पथकांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली त्याचबरोबर सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती
घेतली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी सहभागी झाले. त्यांच्या मुक्कामाची व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली. याकरिता घरटी 25 चपात्या व शेंगदाणा चटणी याचे नियोजन करण्यात आले. सभेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी लाईट व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, अग्निशमन दल,रुग्णवाहिका, स्वच्छतागृहाची व्यवस्था, स्नानगृहाची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
सभा आटोपल्यानंतर जरांगे यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेला रवाना होत असताना वाकसई ते वलवण गावापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
- Advertisment -

You cannot copy content of this page