Saturday, June 21, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" विठ्ठलनगर मधील व्होल्टेजची समस्या घेऊन ऍड. सुषमा ढाकणे अलर्ट "

” विठ्ठलनगर मधील व्होल्टेजची समस्या घेऊन ऍड. सुषमा ढाकणे अलर्ट “

मा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची मुंबई येथे घेतली भेट..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील विठ्ठल नगर प्रभागात गेली अनेक वर्षे विजेच्या व्होल्टेजच्या समस्याने नागरिक त्रस्त आहेत . या विजेच्या चढ उतार मुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे देखील नुकसान होत असल्याने या गंभीर समस्येचे निराकरण करण्याचा ” विडा ” भारतीय जनता पक्षाच्या मा. जिल्हा युवती प्रमुख ऍड. सुषमा ढाकणे यांनी उचलला असून त्या ” अलर्ट ” होवून बुधवार दि. १८ जून २०२५ रोजी ” मा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ” यांची मुंबई निर्मल भवन येथे भेट घेवून त्यांना विठ्ठलनगर मधील व्होल्टेज च्या समस्या बाबत सांगितले . विठ्ठलनगर रहिवासी यांच्या तर्फे कर्जत वीज वितरण कंपनीला निवेदन सुद्धा देण्यात आले असून याबाबतीत यावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्वरित कर्जत वीजवितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांच्याशी संपर्क साधून हे काम तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.


दि.९ जून रोजी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांची ऍड. सुषमा ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल नगर वासियांनी भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. यावेळी सोनिया गरवारे यांच्या समवेत पांडुरंग गरवारे, प्रल्हाद बहुगुणी, राजन दगडे, विलास चंदन, अवधूत केळकर, राजन वैशंपायन , बिराज पाटकर , सर्वेश गोगटे, ॲड. अभिषेक तिवारी, प्रशांत प्रभुणे, सचिन श्रीखंडे आदींनी भेट घेवून चर्चा केली व निवेदन सादर केले.


सध्याची ट्रान्सफॉर्मर क्षमता १०० केव्हीए आहे जी विठ्ठलनगर आणि आसपासच्या २० हून अधिक इमारतींना वीज पुरवते, ज्यामुळे व्होल्टेजमध्ये गंभीर चढ-उतार होतात. तसेच या परिसरातील काही पोल पडले होते ते पुन्हा उभारण्यात आले नाही ते पुन्हा उभे करावेत, व ” २१५ किलोवॅट ” क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी या निवेदनाव्दारे त्यांनी केली , जेणेकरून अखंडित व सुरळीत वीजपुरवठा होऊ शकेल.


मा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपकार्यकारी अभियंता केंद्रे यांना पोल तातडीने उभे करण्याच्या सूचना केल्या व ट्रान्सफॉर्मर साठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले त्यावर युवती नेत्या सुषमा ढाकणे यांनी राज्यमंत्री यांचे आभार मानले.कर्जत विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता केंद्र यांनी यावर गंभीर दखल घेत दि. १९ जून पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात केली असल्याचे दिसत असल्याने , ऍड. सुषमा ढाकणे यांच्या प्रयत्नांना ” यश ” आले असल्याने परिसरातील सर्वांनी त्यांचे आभार व्यक्त केले .

- Advertisment -

You cannot copy content of this page